|
आयुष्यभराच्या सोबतीसाठी जोडीदाराची निवड करणं तसं जिकिरीचं काम असतं. या निवडीबाबत कोणती नियमावली नाही. तरीही जोडीदाराची निवड करताना काही काळजी अवश्य बाळगली पाहिजे. त्यासाठीच हा संवाद :
खरं तर प्रत्येक युवक- युवतीच्या मनात त्याचा जोडीदार म्हणजे स्वप्नातला राजकुमार किंवा राजकुमारीच असते. कदाचित यामुळेच अपेक्षांचं ओझं या काळात मनावर असणं स्वाभाविक असतं; पण केवळ नुसत्या मोठमोठ्या अपेक्षा बाळगण्यात अर्थ नसतो. विवाहापूर्वी आपल्या विवाहाकडून आणि जोडीदाराकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. अनेकदा विवाहेच्छूंनी याचा म्हणावा तितक्या गांभीर्याने विचार केलेला नसतो.
विवाह हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय आहे, त्यामुळे आपला जीवनपटच बदलू शकतो, हे लक्षात घ्यावं. आपल्याला नेमका कसा जोडीदार हवा, हे ठरवण्याआधी आपला स्वभाव, आवडीनिवडी, गुणदोष यांचा बारकाईने विचार केला जावा. स्वतःबद्दल योग्य भान असेल तर आपल्या गरजाही स्पष्टपणे समजून येतात; पण अनेकदा तरुण मुला- मुलींना स्वतःचीच नीट ओळख पटलेली नसते. आपलं करिअर, जीवनविषयक दृष्टिकोन, ध्येय यांचा विचार केलेला नसतो. मग अशा संभ्रमित अवस्थेत तुम्ही योग्य जोडीदार निवडाल, अशी अपेक्षा तरी कशी करायची? यासाठी विवाह करण्यापूर्वीच स्वतःमध्ये डोकावून स्वतःचीच ओळख करून घ्यायचा प्रयत्न करावा, हे आत्मभान फार महत्त्वाचे आहे.
जोडीदाराविषयी तरुण मुला-मुलींना अपेक्षा विचारल्या तर बऱ्याचदा ठराविक साच्याची उत्तरं मिळतात. मुलांना गोरी, सुंदर, सडपातळ, मनमिळाऊ, गृहकृत्यदक्ष वधू हवी असते, तर मुली उंच, देखणा, मनमोकळा, भरपूर पैसा मिळवणारा, फारशा कौटुंबिक जबाबदाऱ्या नसणाऱ्या वराला प्राधान्य देतात.
पण उत्तम सहजीवनासाठी या सर्व अपेक्षा किती उथळ आणि वरवरच्या आहेत असं नाही वाटत तुम्हाला? तरुण वयात बाह्य रूपाबद्दल आकर्षण वाटणं साहजिक आहे; पण सुंदर दिसणं आणि सुंदर व्यक्तिमत्त्व यातला फरक इथे लक्षात घ्यायला हवा. सौंदर्याच्या रूढ मोजमापात न बसणारी एखादी मुलगी तिचा प्रसन्न स्वभाव, बुद्धिमत्ता यामुळे अंतर्बाह्य सुंदर भासू शकते. दिसायला सर्वसाधारण मुलगा आपल्या असामान्य कर्तबगारीच्या बळावर रुबाबदार दिसतो. जीवनातल्या प्रत्येक कसोटीच्या प्रसंगी तुमचा खंबीरपणा, जिद्द, आशावादी सकारात्मक दृष्टिकोन, तुमच्यातले गुण उपयोगी पडतात; रूप नव्हे हे लक्षात घ्या. जोडीदार निवडताना त्याचं शिक्षण, घरातलं वातावरण, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, संस्कार प्राधान्यानं लक्षात घ्यायला हवेत.
शिक्षणाच्या पायावरच पुढे करिअरची इमारत उभी राहणार असते. त्याला योग्य महत्त्व द्यायलाच हवं. दोघांचं शिक्षण एकाच क्षेत्रातलं असलं तर ते फायदेशीरही ठरू शकतं. उदाहरणार्थ वैद्यकीय क्षेत्रातील मुलं-मुली शक्यतो त्याच क्षेत्रातल्या जोडीदार निवडतात. पण तसं नसेल तर परस्परांच्या शिक्षण व व्यवसायाबद्दल आदर मात्र नक्कीच हवा. अमुक एका क्षेत्राबद्दल आपल्या मनात अढी असेल तर त्याचाही विचार करावा. नाही तर लग्नानंतर प्रश्न उद्भवू शकतात. जोडीदाराच्या कामाचं स्वरूप, त्याच्या व्यवसायातील धोके, खाचाखोचा, तो संसाराला किती वेळ देऊ शकेल या सर्वांचा आधीच साकल्याने विचार करावा. म्हणजे संसार सुरू झाल्यावर अपेक्षाभंग व कुरबुरी होत नाहीत. आर्थिक स्तर हा विवाह करताना लक्षात घ्यायलाच हवा असा विषय.
आर्थिक स्थितीबाबत कधीकधी अगदी पराकोटीच्या अटी असलेल्या दिसतात, तर कधी अगदीच अनास्था. विशेषतः मुलाच्या सांपत्तिक स्थितीबाबत मुली आणि त्यांचे पालक फारच काटेकोरपणे विचार करताना दिसतात. कधी कधी अतिशय गुणी मुलाला केवळ या कारणावरून नकार दिला जातो. पण कोणताही युवक २७-२८ व्या वर्षी घर, बंगला, गाडी, अत्याधुनिक जीवनशैली इत्यादी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. या वयात तर जीवनसंघर्षाची सुरवात असते. त्याच्या स्वकर्तृत्वावर तो पुढील आयुष्यात या सर्व गोष्टी मिळवू शकतो. सगळं आयतं मिळण्यापेक्षा स्वतःच्या कष्टातून आपलं घर उभं करण्यात वेगळीच मजा असते, हे मुलींनीही लक्षात घ्यायला हवं. त्यात तुमचा मोलाचा सहभाग लाभला तर पुढील आयुष्यात वाटणारी कृतार्थता अनमोल असेल. कर्तृत्ववान जोडीदार ही खरी संपत्ती आहे.
जोडीदाराचा बौद्धिक स्तर, कौटुंबिक वातावरण हेदेखील तितकंच महत्त्वाचं. बाह्य गोष्टींच्या भुलभुलैय्यात अनेकदा जोडीदाराशी आपलं बौद्धिक स्तरावर नातं जुळेल की नाही, हे लक्षातच घेतलं जात नाही. शिक्षण, वाचन, प्रगल्भता, बौद्धिक पातळी, समजून घेण्याची कुवत या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या जाणून घ्यायच्या तर विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी दोघांनी पुरेशा गप्पागोष्टी करून एकमेकांना समजून घेण्याला पर्याय नाही. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा. आवडीनिवडी आणि मानसिकता लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
वाचन संस्कृतीत, पुस्तकांच्या जगात वाढलेली मुलगी रूक्ष, व्यवहारी घरात घुसमटेल किंवा एखाद्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या मुलाला अगदी नास्तिक पत्नी मिळाली तर दोघांनाही त्याचा त्रास होईल. म्हणून जोडीदाराची मानसिकता निर्णय घेण्यापूर्वी लक्षात घ्या. मतभिन्नता हा पुढे फार मोठा वादाचा मुद्दा होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचाही विचार केला जावा. त्या जबाबदाऱ्या आपल्याला नीटपणे पेलायच्या आहेत अशी मानसिक तयारी असेल तर संसार सोपा होतो. मुलाचे आई-वडील, भावंडं यांच्याबरोबरच घरात एखादी अपंग, मतिमंद व्यक्ती असेल तर त्यांची जबाबदारी घ्यायची मानसिक तयारी हवी. कुटुंबातल्या प्रत्येकाला आपली गरज असते हे लक्षात घ्यावं.
भावी पतीवरच्या किंवा पत्नीवरच्या आर्थिक जबाबदाऱ्याही लक्षात घ्या. त्याबाबत नाराजीचा सूर नसावा. आपली पत्नी जर तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असेल तर साहजिकच तिच्यावर त्यांची जबाबदारी राहील. अशा वेळी लग्नाआधीच पतीने त्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
पत्रिका बघणे हा आपल्याकडे अजून वादाचा विषय आहे. हा प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग असतो. मुलगा-मुलगी दोघांनाही पत्रिका बघायची असेल तर वादच नसतो. पण पत्रिका बघायची की नाही हे आधीच ठरवावे. पत्रिका बघायची असेल तर आधी पत्रिका जुळतेय की नाही ते पाहावे व मगच मुला-मुलींनी भेटावे. म्हणजे उगीच कुणाचा वेळ आणि शक्ती वाया जाणार नाही. आधी मुला-मुलीची भेट, चर्चा झाली, पसंती झाली आणि मग कुटुंबातल्या कुणी पत्रिकेचा मुद्दा उपस्थित केला आणि लग्न मोडलं तर ते सर्वांनाच त्रासदायक होतं. हे टाळावं. मुलांकडच्यांना पत्रिका मागायचा हक्क आहे, तसा मुलीच्या पालकांनाही मुलाची पत्रिका मागायचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवावं. युग समानतेचं आहे. जोडीदार निवडताना एवढं सगळं लक्षात घेतलं तर शेवटी निर्णय घेताना आतून हो म्हणावंसं वाटणं हे उरतंच. ती अनुभूती ज्याची त्यालाच घ्यायची असते. फक्त त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा!
|